नवी दिल्ली, 01 मे: (विश्वजीत खाटमोडे) कोविशिल्ड लस घेणाऱ्या लोकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविशिल्ड लस उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेनेकाने लंडनच्या न्यायालयात प्रथमच कबूल केले आहे की, कोविड लसीच्या दुर्मिळ प्रकरणांमध्ये आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोविशिल्ड लसीबाबत सध्या जगभरात वाद निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत घाबरून जाण्याची गरज नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या लसीचे फायदे अधिक आणि तोटे खूपच कमी आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
डॉक्टर काय म्हणाले?
याबाबत एम्सचे प्राध्यापक डॉ. संजय राय म्हणाले की, यासंदर्भातील वादात पडण्याची गरज नाही. कोणत्याही औषधाचे साईड इफेक्ट्स असतात, पण त्याचे फायदे जास्त आणि तोटे फार कमी असतात. त्यामुळे याबाबत काळजी करण्याची गरज नाही. आयएमएचे माजी सरचिटणीस डॉ. नरेंद्र सैनी यांनी म्हटले की, सर्व औषधांचे साईड इफेक्ट्स असतात. पण याचा अर्थ असा नाही की, आपण सर्व औषधे घेणे बंद केले पाहिजे. त्यावेळी कोविशिल्डने कोरोनापासून संरक्षण करण्याचे काम केले होते, तर काही दुष्परिणामही समोर आले आहेत. पण त्याचे फायदे जास्त आणि तोटे कमी आहेत. कोणतीही लस तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. साधारणपणे, लसीच्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी सुमारे दहा वर्षे लागतात आणि नंतर ती बाजारात येते, परंतु कोरोनाचा काळ असा होता की लोकांचे आयुष्य लक्षात घेऊन ही लस तयार केली गेली. त्यामुळे करोडो लोकांचे प्राण वाचले. पुढे ते म्हणाले की, लसीचे दुष्परिणाम आढळून आले आहेत ही चांगली गोष्ट आहे. आता डॉक्टर अशा प्रकारे आजारी व्यक्तींवर उपचार करू शकतील आणि पुढील संशोधनही करता येईल.
काय दुष्परिणाम होतात?
यूके मधील फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने लंडनच्या न्यायालयात प्रथमच कबूल केले आहे की, मान्य केले आहे की तिच्या कोरोना लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच TTS होऊ शकते. या आजारामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ॲस्ट्राझेनेका कंपनीची ही लस भारतात कोविशिल्ड या नावाने ओळखली जाते. भारतात ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आली.