मुंबई, 30 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात रिषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन यष्टिरक्षकांची निवड करण्यात आली आहे. तसेच सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वाल याला संधी देण्यात आली आहे. या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्यासह शिवम दुबेला संधी मिळाली आहे. सोबतच रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोघांना संधी मिळाली आहे. तर जसप्रीत बुमराह याच्यासोबत अश्रदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळणार आहेत. बीसीसीआयच्या निवड समितीने या संघाची निवड करताना या खेळाडूंचे सध्याचे आयपीएल मधील प्रदर्शन विचारात घेतले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1785250931166060585?s=19
केएल राहुलला वगळले
टी-20 विश्वचषकासाठी निवड झालेल्या भारतीय संघात शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या संघात केएल राहुलला स्थान मिळाले नाही. टी-20 विश्वचषकासाठी निवड झालेल्या संघातून त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्याजागी रिषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन यष्टिरक्षकांच्या नावाला निवड समितीने पसंती दिली आहे. मधल्या फळीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे अनुभवी खेळाडू असणार आहेत. त्याचबरोबर, या संघात रिंकू सिंग ऐवजी शिवम दुबे याला संघात स्थान मिळाले आहे. शिवम दुबे सध्या आयपीएलमध्ये चेनई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना चांगले प्रदर्शन करत आहे. त्याने गेल्या अनेक सामन्यांत आक्रमक फटकेबाजी करून मोठ्या धावसंख्या केल्या आहेत. या कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.
रोहित शर्माच कर्णधार!
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. या टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक) आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.