उष्णतेची लाट; उष्माघाताचा धोका वाढला! पाहा काय करावे आणि काय करू नये?

मुंबई, 30 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून देशात उष्णतेची लाट आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश भागांत दुपारचे तापमान सध्या 40 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उष्णता, अति उष्णता, उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. सामान्य मानवी शरीराचे तापमान 36.4 अंश सेल्सिअस ते 37.2 अंश सेल्सिअस दरम्यान असते. अशा परिस्थितीत उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. विशेषतः लहान मुले आणि बालके, उन्हात काम करणारे लोक, शारीरिकदृष्ट्या आजारी, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब, गर्भवती महिला यांनी उष्माघात टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

https://twitter.com/MahaHealthIEC/status/1779387028494311617?s=19

उष्माघाताची लक्षणे –

अशक्तपणा जाणवणे, डोकेदुखी, ताप, उलट्या, छातीत धडधडणे, जास्त प्रमाणात घाम येणे, बेशुद्ध पडणे किंवा चक्कर येणे, नाडीची गती असामान्य होणे, मानसिक स्थिती बदलणे, चिडचिड, फेफरे येणे, गरम, लाल आणि कोरडी त्वचा होणे, शरीराचे तापमान वाढणे, धडधडणारी डोकेदुखी यांसारखी अनेक उष्माघाताची लक्षणे आढळतात.

काय करावे –

शक्य तितके चांगल्या हवेशीर आणि थंड ठिकाणी, घरामध्ये, सावलीत राहावे. गरज नसेल तर घराबाहेर जाणे टाळावे. दिवसाच्या थंड वेळेमध्ये घराबाहेरील कामांचे नियोजन करा. तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे. तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. भरपूर ताजे व हलके अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे. पातळ, सैल, सुती किंवा आरामदायी, फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हात बाहेर जाताना डोके झाकावे. त्यासाठी टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावी. भरपूर पाणी, ओआरएस पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे. थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर, उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात. तुमच्या घराच्या ऊन येणाऱ्या बाजूच्या खिडक्या दिवसा बंद ठेवा आणि रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडाव्यात. हवामान विभागाच्या नवीन माहितीवर लक्ष ठेवा. गरज वाटल्यास जवळच्या रुग्णालयाला भेट द्यावी.

काय करू नये –

शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रिकाम्या पोटी बाहेर उन्हात जाऊ नये. उन्हात अधिक वेळ थांबू नये. तिखट मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नये. ताप आल्यास थंड पाण्याची पट्टी ठेवावी. कूलर किंवा एसीमधून थेट उन्हात बाहेर जाऊ नये. यामध्ये दुपारी 12 ते 3 या काळात उन्हात बाहेर जाणे टाळावे. चप्पल किंवा बूट न घालता बाहेर जाऊ नये. चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये, साखरयुक्त असलेली पेये तसेच अल्कोहोलचे सेवन करणे टाळावे. पार्क केलेल्या वाहनामध्ये लहान मूलांना ठेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *