बारामती, 30 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय तुर व हरभरा खरेदी केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. ही योजना 2023-24 या हंगामात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने राबविण्यात येणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत 25 जून 2024 पर्यंत असणार आहे. या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतक-यांची तुर प्रति क्विंटल 7 हजार रुपये दराने, तसेच चना (हरभरा) प्रति क्विंटल 5 हजार 440 रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
सध्या तुर व हरभरा नवीन हंगाम सुरू झाल्याने बाजारात आवक सुरू झाली आहे. बारामतीमध्ये शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र मंजुर झाले असुन, शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर दिलेल्या मुदतीत नाव नोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा, असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार आणि उपसभापती निलेश लडकत यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे –
शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी तुर व हरभरा पिकाची नोंद असलेल्या चालू 7/12 उतारा (पिकपेरा), आधारकार्डची छायांकित प्रत व चालू असलेले बॅक खाते अचुक तपशीलासह झेरॉक्स, मोबाईल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे तसेच एका पेक्षा जास्त बँक खात्यात एकाच शेतकऱ्याची नोंद असु नये. तरी तुर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी बारामती येथील निरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक याठिकाणी प्रथम ऑनलाईन नाव नोंदणी करावी. खरेदी सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार तुर व हरभरा खरेदी केंद्रावर आणण्यासाठी नंबर नुसार एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.
त्यानुसार, शेतकऱ्यांनी आपला तुर व हरभरा शेतमाल बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे यांत्रिक चाळणी येथील खरेदी केंद्रावर स्वच्छ व वाळवुन आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांची नाव नोंदणी होईल, त्याच शेतकऱ्यांचा तुर व हरभरा हा शेतमाल खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली आहे.