अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दिल्ली, 29 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांत तक्रार केली होती. अमित शाह यांचा हा व्हिडिओ बनावट असल्याचे गृहमंत्रालयाने तक्रारीत म्हटले होते. त्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या या प्रकरणाची दिल्ली पोलीस चौकशी करीत आहेत. दरम्यान, अमित शाह यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

https://twitter.com/ANI/status/1784650001777402345?s=19

अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या व्हिडिओत अमित शाह हे एससी, एसटी आणि ओबीसी यांचे आरक्षण काढून टाकू, असे विधान करताना दिसत आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यांनी तसे म्हटले नाही. तर अमित शाह यांचा हा व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. दुसरीकडे मात्र अमित शाह यांच्या या व्हिडिओमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहिता आयपीसी च्या कलम 153, 153ए, 465, 469, 171जी आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम 66सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

गृहमंत्र्यांची तक्रार

फेसबुक आणि ट्विटरच्या वापरकर्त्यांकडून काही एडिट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले जात असल्याचे आढळले आहे. गृह मंत्रालयाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “अमित शाह यांच्या व्हिडिओशी छेडछाड केल्याचे दिसते. या व्हिडिओच्या माध्यमातून समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.” याबाबत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तर याप्रकरणात आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *