सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सासवड येथे जाहीर सभा पार पडली

सासवड, 28 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ पुणे जिल्ह्यातील सासवड येथे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार उमेदवार सुप्रिया सुळे, आमदार सचिन अहिर, आमदार संजय जगताप, सनदी अधिकारी संभाजी झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते विजय कोलते, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी जि.प. सदस्य सुदाम इंगळे, पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमन, पुरंदर तालुका शिवसेना अध्यक्ष अभिजित जगताप, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1784613608724529546?s=19

काय म्हणाले शरद पवार?

या सभेतून शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. “नरेंद्र मोदी उद्या दोन दिवसांनी पुण्यात येणार आहेत. मोदी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीत करतील. त्यानंतर मग त्यांना आठवण येईल, शरद पवार, आणखीन कुणी.” असे शरद पवार यावेळी म्हणाले. बारामतीमध्ये येऊन मोदींनी एकदा सांगितलं की, शरद पवारांचे बोट हातात धरून मी राजकारणात पावलं टाकली आणि त्यानंतर 8 महिन्यांनी निवडणुकीत ते आले आणि म्हणाले की, यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे जे काही करता येईल ते करा. लोकशाहीत टीका करण्याचा त्यांचा अधिकार आहे. तो काही मी म्हणत नाही. पण भूमिकेमध्ये, विचारामध्ये सातत्य पाहिजे. दिल्लीत एक, मुंबईत दोन, बारामतीत तीन याचा अर्थ काय समजायचा? असा सवाल शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला.

नरेंद्र मोदींवर टीका

आजकाल मोदीसाहेब ठिकठिकाणी सांगतात की 400 के पार. खरं म्हणजे, या देशातील लोकसभेच्या ज्या एकंदर जागा आहेत त्याच त्यांना मिळाल्या असत्या तर खऱ्या अर्थाने आनंद झाला असता. कशासाठी 400 के पार? 400 के पार याचा अर्थ असा आहे की, त्यांना हव्या त्या पद्धतीने या देशात कायदे करून ते करण्यासाठी लागणाऱ्या खासदारांची संख्या त्यांना हवी आहे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या घटनेत त्यांना परिवर्तन करायचं आहे. जेव्हा टिका झाली त्यावेळेस ते सांगतात की, संविधानाच्या परिवर्तनाचा विचार आमच्या मनात नाही. परंतु त्यांचे खासदार आपल्या भाषणातून संविधान बदलण्याबद्दल सांगतात. मोदी साहेब ठिकठिकाणी सांगतात. महाराष्ट्रात आल्यानंतर आम्हा लोकांची आठवण ठेवतात. टिकाटिप्पणी करतात. उद्या 2 दिवसांनी पुण्यात येणार आहेत. तुम्ही त्यांचं भाषणं ऐका, नक्कीच ते सांगतील आल्यानंतर म्हणतील ‘पुणेकरांना माझा नमस्कार’, याने त्या भाषणाची सुरुवात करतील. आणखी ते मराठी भाषेत बोलतील आणि त्यानंतर मग त्यांना आठवण येईल, शरद पवार, आणखीन कुणी. किती गंमतीची गोष्ट आहे? अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *