कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना क्लिन चीट

बारामती, 24 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच रोहित पवार यांना देखील याप्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1783034025218855237?s=19

काय आरोप झाले होते?

शिखर बँकेने 15 ते 20 वर्षांपूर्वी काही सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे तसेच कारखाने तोट्यात गेल्याने हे कर्ज बुडाले. मात्र, त्यानंतर हेच कारखाने काही नेत्यांनी कमी दरामध्ये खरेदी केले. तसेच या कारखान्यांना पुन्हा एकदा शिखर बँकेने कर्ज दिले. यांसारखे आरोप करण्यात आले होते. तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा हा शिखर बँक घोटाळा असल्याचा दावा करण्यात आला होता. तेव्हा अजित पवार या बँकेच्या संचालक मंडळावर होते. मात्र, शिखर बँक घोटाळा प्रकरणातून अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेत्यांना मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेकडून आता क्लीन चीट मिळाली आहे. यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

क्लोजर रिपोर्टमध्ये काय म्हटले?

याप्रकरणी कर्ज वाटप व साखर कारखान्यांची विक्री यामध्ये कसलाच गैरव्यवहार झाला नसल्याचे या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच शिखर बँकेला देखील यामध्ये कसलेही नुकसान झालेले नाही. याप्रकरणी अजित पवारांसह कोणाच्याही विरोधात कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असेही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *