अमित शाह यांनी गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला

गांधीनगर, 19 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप उमेदवार अमित शाह यांनी आज गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अमित शाह यांनी गांधीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. दरम्यान, गांधीनगर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर याठिकाणी 7 मे रोजी मतदान होणार आहे.

अमित शाह यांची प्रतिक्रिया

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज मी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. ज्या मतदारसंघात लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रतिनिधित्व केले. तसेच या मतदार संघात पंतप्रधान मोदी मतदार आहेत, तेथून मला उमेदवारी मिळाली आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी येथूनच 30 वर्षे आमदार खासदार राहिलो. येथील जनतेने मला खूप प्रेम दिले असल्याचे अमित शाह यावेळी म्हणाले.

गांधीनगर भाजपचा बालेकिल्ला!

दरम्यान, गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघ हा गेल्या 3 दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगर मतदार संघात 1998 पासून ते 2014 पर्यंत खासदार होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अमित शाह यांना उमेदवारी दिली. त्यावेळी अमित शाह यांनी काँग्रेस उमेदवार चतुरसिंह जावंजी चावडा यांचा पराभव केला होता. अमित शाह यांनी या निवडणुकीत साडेपाच लाखांपेक्षा अधिक मतांनी विक्रमी विजय मिळवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *