अमोल कोल्हे यांचा शिरूरमधून उमेदवारी अर्ज दाखल

पुणे, 18 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे विरुद्ध महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अमोल कोल्हे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज पुण्यातील विधानभवन येथे दाखल केला आहे. याप्रसंगी, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, आमदार अशोक पवार, सचिन अहिर, संजय जगताप, संग्राम थोपटे, महादेव बाबर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमोल कोल्हे यांनी काय म्हटले?

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी एक ट्विट केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मला पुन्हा लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल, हा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी, माता भगिनींच्या सन्मानासाठी, युवकांच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी अविरतपणे संघर्ष करत आहे. या संघर्षाला मायबाप जनतेचं पाठबळ नक्की मिळेल, हा विश्वास आहे,” असे अमोल कोल्हे या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील

दरम्यान, शिरूर मतदार संघात यंदा देखील अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यंदा राष्ट्रवादीत फूट पडली आहे. यामध्ये अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. तर दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे आढळराव पाटलांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तर यंदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवताना शिवाजीराव आढळराव पाटील हे अमोल कोल्हे यांचा पराभव करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *