एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी! राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव, 17 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांना 4 ते 5 वेळा फोन करून ही धमकी दिली आहे. या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सोबतच त्यांनी यावेळी सुरक्षेची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हे धमकीचे फोन कॉल अमेरिकेतून आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

अमेरिकेतून दिली धमकी

तत्पूर्वी, एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन गेल्या दोन दिवसांपासून येत होते. सुरूवातीला त्यांनी या फोन कॉलकडे दुर्लक्ष केले. मात्र, या धमकी देणाऱ्याने चार ते पाच वेळा फोन केल्यामुळे एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या नंबरवरून आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून एकनाथ खडसे यांना हे फोन केले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याने अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या नावाचा वापर करून एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मात्र, त्याने एकनाथ खडसे यांना का धमकी दिली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तसेच पोलिसांकडून धमकी देणाऱ्यांचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

लवकरच भाजपमध्ये घरवापसी करणार

दरम्यान, एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात असून, ते येत्या काही दिवसांत भारतीय जनता पार्टीत पुन्हा एकदा प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी या नेत्यांसोबत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली होती. तत्पूर्वी, एकनाथ खडसे हे 2020 मध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले होते. ते आता भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *