बाबासाहेबांच्या जयंतीदिनी असणारा मेगाब्लॉक रद्द करण्यासाठी वर्षा गायकवाड यांचे रेल्वे प्रशासनाला पत्र

मुंबई, 14 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मध्य व पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध मार्गांवर आज देखभाल व दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक सामाजिक संघटनांनी आजचा हा रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, रेल्वे प्रशासनाने आजचा बोरिवली – गोरेगाव या मार्गावरील मेगाब्लॉक रद्द केला आहे.

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1779094093454606611?s=19

वर्षा गायकवाड यांचे पत्र

दरम्यान, मध्य व पश्चिम रेल्वेकडून करण्यात येणारा आजचा मेगब्लॉक रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्या वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापकांना एक पत्र लिहिले आहे. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक 14 एप्रिल रोजी जयंती आहे. दरवर्षी देशभरातील लाखो आंबेडकर प्रेमी, बाबासाहेबांवर, त्यांच्या विचारावर श्रद्धा असणारे लोक मुंबईतील दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास येत असतात.

पत्रात काय म्हटले?

मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेने रविवार दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी तिन्ही मार्गावर लोकलचा मेगाब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. महोदय, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर लाखौंचा जनसागर येणार याची कल्पना आपणास असायला हवी होती. असे असतानाही आपण मेगाब्लॉक ठेवून कोट्यवधी आंबेडकर अनुयायांच्या मार्गात अडथळा आणत आहात. आपणास विनंती आहे की, तातडीने आपण हा मेगाब्लॉक रद्द करावा व तशा सुचना प्रसिद्धी माध्यमांकडे द्याव्यात व रेल्वेच्या माध्यमातून उ‌द्घोषणा करावी. असे वर्षा गायकवाड यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *