सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा यांना पुन्हा एकदा फटकारले, माफीनामा फेटाळला

नवी दिल्ली, 10 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पतंजली आयुर्वेद कंपनीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांना फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने यावेळी रामदेव बाबा यांनी मागितलेली माफी फेटाळून लावली आहे. तसेच त्यांनी पुढील कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा देखील सुप्रीम कोर्टाने दिला आहे. याशिवाय रामदेव बाबा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आम्ही समाधानी नाही, असेही सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटले आहे. त्यामुळे आता रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माफीनामा स्वीकारण्यास नकार

सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांना पुन्हा एकदा खडसावले आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा यांचा माफीनामा फेटाळला. तसेच तुम्ही प्रतिज्ञापत्रात फसवणूक करीत आहात, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे रामदेव बाबा यांचे बिनशर्त माफीचे प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. तुम्ही आमच्या आदेशाकडे तीन वेळा दुर्लक्ष केले आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, आम्ही आंधळे नाही, असे सुप्रीम कोर्टाने या सुनावणीवेळी म्हटले आहे. या प्रकरणाची आज सुनावणी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर झाली.

इंडियन मेडिकल असोसिएशनची याचिका

दरम्यान, रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी 6 एप्रिल रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागितली होती. यामध्ये त्यांनी भविष्यात अशा जाहिराती दाखविल्या जाणार नसल्याचे सांगितले होते. पतंजली आयुर्वेद कंपनीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी पतंजली कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली आहे. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 एप्रिल रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *