महायुतीला पाठींबा दिल्यानंतर फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार!

मुंबई, 09 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात ही घोषणा केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी राज ठाकरे यांचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1777718273897066762?s=19

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या! असे देवेंद्र फडणवीस या ट्विटमधून म्हणाले आहेत. तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांनी कालच राज ठाकरे हे महायुतीला आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

पाठिंबा देताना राज ठाकरे काय म्हणाले?

एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही. मी रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो, असे राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यातील सभेत म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *