सासवड, 08 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीतील बारामती मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज विजय शिवतारे यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार या आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सुनेत्रा पवार यांनी विजय शिवतारे यांची त्यांच्या सासवड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याप्रसंगी, विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांना विजयासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवतारे यांच्या कन्या आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो
“काही दिवसांपूर्वी माझी भूमिका जरूर वेगळी होती. मात्र राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आता दोस्तीचे नवे पर्व सुरू झाले असून, पुरंदर हवेलीतील जनतेचे काय हित साधले गेले? हे स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सासवडमध्ये येऊन सांगणार आहेत. येत्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या त्या मेळाव्यानंतर सर्व वातावरण स्वच्छ होईल. खऱ्या अर्थाने तो दिवस बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या विक्रमी विजयात महत्वाचा ठरणार आहे,” असे विजय शिवतारे यावेळी म्हणाले. तसेच विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांना यावेळी विजयासाठी शुभेच्छा देऊन आपण प्रचारात सहभागी होत असल्याचे सांगितले.
विजय शिवतारे प्रचारात सहभागी
दरम्यान, सुनेत्रा पवार या आज सकाळपासून पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधत आहे. या दौऱ्यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विजय शिवतारे यांच्या सूचनेवरून सहभागी झाले होते. असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. तर काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे हे अजित पवार यांच्यावर नाराज होते. त्यामुळे विजय शिवतारे यांनी बंडाची भूमिका घेत बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर बारामती मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या नेत्यांनी विजय शिवतारे यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी या नेत्यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील वाद मिटवला होता. त्यानंतर विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांनी यावेळी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. तर आता विजय शिवतारे हे सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत.