एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार! रोहिणी खडसे यांची पुढील भूमिका काय?

मुंबई, 07 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ खडसे यांनी ऑक्टोंबर 2020 मध्ये भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते आता जवळपास साडेतीन वर्षानंतर भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. याची घोषणा एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, रोहिणी खडसे यांनी यासंदर्भात ट्विट करून अशाप्रकारच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

https://twitter.com/Rohini_khadse/status/1776633998317682881?s=19

रोहिणी खडसे ट्विटमध्ये काय म्हणाल्या?

“मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच… लढ़ेंगे और जीतेंगे!” असे ट्विट रोहिणी खडसे यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह असलेली तुतारी वाजवत असल्याचा त्यांचा फोटो देखील शेयर केला आहे. त्यामुळे जरी एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असले तरीही रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहिणी खडसे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत.

एकनाथ खडसे लवकरच भाजपात जाणार

तत्पूर्वी, एकनाथ खडसे हे येत्या 8 किंवा 9 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. तेंव्हापासून खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आता आपण भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख जाहीर केलेली नाही. दरम्यान, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *