विजय शिवतारे यांची माघार! बारामतीतून निवडणूक लढविणार नाहीत

मुंबई, 30 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, विजय शिवतारे यांनी आता यु-टर्न घेतला आहे. आपण बारामती मतदार संघातून निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली आहे. त्यामुळे विजय शिवतारे यांचे बंड शांत करण्यास आणि विजय शिवतारे यांचा अजित पवार यांच्यासोबतचा वाद मिटवण्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे विजय शिवतारे हे आता आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.

महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार

यासंदर्भात विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पुरंदरमधून महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच घड्याळाला कमीत कमी दीड लाख मते झालीच पाहिजे, अशा सूचना सर्वांना दिल्या असल्याचे विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचे आमचे ध्येय आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत एक मत देखील इकडे तिकडे जाता कामा नये, त्यादृष्टीने सर्वांनी काम करावे. येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात महायुतीचा उमेदवार पुरंदरमधून कमीत कमी 50 हजार मताधिक्याने निवडून आला पाहिजे, असे विजय शिवतारे यावेळी म्हणाले.

बारामतीत तिरंगी लढत टळली

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर बारामतीत महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे बारामतीत यंदा तिरंगी लढत होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीत बारामती लोकसभा मतदार संघाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा वाद देखील मिटविण्यात आला. त्यामुळे आता विजय शिवतारे हे येत्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसणार आहेत. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. याबाबतची घोषणा लवकरच होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *