महादेव जानकर यांचा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय! लोकसभा निवडणुकीत रासपला एक जागा मिळणार

मुंबई, 24 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महादेव जानकर यांनी आज महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महादेव जानकर हे या लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीकडून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महादेव जानकर यांनी काय म्हटले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. त्यामुळे आपण मोदी यांच्यासोबत आहोत, असे महादेव जानकर यावेळी म्हणाले. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीला मोठा धक्का

दरम्यान, काही दिवसांपासून महादेव जानकर हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यामुळे महादेव जानकर हे महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महादेव जानकर यांनी आज अचानकपणे महायुतीसोबत जाणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *