मुंबई, 22 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस पक्षाने कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडी पूर्ण पाठिंबा देईल. वंचित बहुजन आघाडी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवते. तसेच वंचित बहुजन आघाडी पक्ष त्यांचा प्रमुख समर्थक आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांबद्दल आम्हाला आदर आहे. असे ते यावेळी म्हणाले.
https://twitter.com/VBAforIndia/status/1771497414379090175?s=19
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
“शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचे कुटुंब चळवळीच्या जवळचे कुटुंब असल्याचे आम्ही मानतो. तिन्ही ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे की, पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने केले जातील. मागे जे घडले होते ते यावेळेस न घडू देणे याची दक्षता सुद्धा त्याठिकाणी घेण्यात येईल,” असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
26 तारखेला भूमिका स्पष्ट करणार!
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे, असे आम्हाला अद्याप ही सांगण्यात आलेले नाही, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. तसेच महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाविषयी 26 तारखेला आमची भूमिका स्पष्ट करू, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. त्यामुळे येत्या 26 मार्च रोजी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जाण्याविषयी कोणता निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.