पंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध

नवी दिल्ली, 22 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) रशियाची राजधानी मॉस्को येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 70 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच या दु:खाच्या काळात भारत सरकार रशियामधील लोकांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. मॉस्कोमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या दु:खाच्या काळात भारत सरकार आणि रशियन फेडरेशनच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

https://x.com/narendramodi/status/1771357097390719438?s=20

70 लोकांचा मृत्यू, शेकडो जखमी

दरम्यान, काल रात्री आठच्या सुमारास रशियाच्या मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलमध्ये तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 70 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट म्हणजेच इसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. तर या घटनेचा सध्या तपास केला जात आहे. तसेच याठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



तत्पूर्वी, हा गोळीबार झाला तेंव्हा क्रोकस सिटी हॉलमध्ये कॉन्सर्ट सुरू होती. या गोळीबारानंतर लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्यामुळे याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी या हल्लेखोरांनी स्फोटकांचाही वापर केला, ज्यामुळे हॉलला आग लागली होती. या दहशतवादी हल्ल्याचा सध्या जगभरातून तीव्र निषेध केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *