शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार?

शिरूर, 22 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात आज मुंबईत एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होऊ शकतो. जर त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला तर आगामी लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवताना दिसणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी होणार आहे.

आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश?

तत्पूर्वी, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांची नाराजी दूर झाल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंदर्भात अजित पवार यांनी आज मुंबईत एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आढळराव पाटलांचा आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूरची जागा अजित पवारांकडे

दरम्यान, महायुतीतील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यासंदर्भात अनेक बैठका घेतल्या जात आहेत. सध्या त्यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाच्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. त्यामुळे शिरूर मतदार संघाची जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा अंदाज आहे. या मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार यांच्याकडे सध्या कोणताही उमेदवार दिसत नाही. तसेच शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील शिरूर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी या जागेवरून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील हे आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *