आमची बँक खाती गोठवली; राहुल गांधींचा थेट भाजप सरकारवर निशाणा

नवी दिल्ली, 21 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची आज महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप सरकारने काँग्रेसची बँक खाती गोठवली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. आमची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे आम्ही निवडणुकीत खर्च करू शकत नाही आणि निवडणुकीत प्रचार करू शकत नाही, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

https://x.com/ANI/status/1770704343773139060?s=20

काय म्हणाले राहुल गांधी?

आम्ही 20 टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करतो. पण आम्ही दोन रुपयेही खर्च करू शकत नाही. निवडणुकीला केवळ 2 महिने शिल्लक असताना हे घडत आहे. आमची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. याविषयी कोणतेही न्यायालय काही करत नाही, ना निवडणूक आयोग किंवा प्रसारमाध्यमे याबाबत काही बोलत नाहीत. असेच गप्प राहिल्यास सर्वांची लूट होईल, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. काँग्रेस पक्षाची बँक खाती सील केल्याप्रकरणी सोनिया गांधी म्हणाल्या की, हा काँग्रेसचा प्रश्न नसून लोकशाहीचा प्रश्न आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया

तसेच यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. देशातील प्रत्येक नागरिक निवडणुकीत सहभागी होण्यास इच्छुक आहे. कोणत्याही लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणुका आवश्यक असतात. निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांसाठी समान संधी असावी. मात्र आज भाजप सरकारचे स्वायत्त संस्थांवर नियंत्रण असून ते त्यांच्या इच्छेनुसार कारवाई करत आहेत. सुप्रीम कोर्टामुळे इलेक्टोरल बाँड्सचे मोठे सत्य समोर आले आहे. भाजप सरकारने षड्यंत्राचा एक भाग म्हणून मुख्य विरोधी पक्षाची बँक खाती गोठवली आहेत, जेणेकरून निधीअभावी त्यांना निवडणूक लढवण्याची समान संधी मिळू नये, असे मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *