पतंजली कंपनीने सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी मागितली; अशा जाहिराती पुन्हा प्रसिद्ध होणार नसल्याची ग्वाही दिली

नवी दिल्ली, 21 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. पतंजली आयुर्वेद कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी आज सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून याप्रकरणी माफी मागितली आहे. भविष्यात अशा जाहिराती प्रसिद्ध होणार नाहीत याची काळजी घेऊ. असे त्यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. लोकांना आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर करून निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हाच आपला हेतू होता, असे देखील आचार्य बालकृष्ण यामध्ये म्हणाले आहेत.

https://x.com/ANI/status/1770671404226130100?s=20

कोर्टात हजर राहण्याचे आदेश

याप्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी होणार आहे. या सुनावणीला रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी हजर रहावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोर्टात हजर न झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांना सुप्रीम कोर्टाने अवमानाची नोटीस बजावली होती. त्यावेळी त्यांना दोन आठवड्यांनी कोर्टात हजर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तर पतंजली आयुर्वेद कंपनीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी

यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानूसार, सुप्रीम कोर्टाकडून पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली होती. तरी देखील पतंजलीकडून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींची मालिका सुरूच होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा यांच्यासह आचार्य बालकृष्ण यांना दोन आठवड्यांनी कोर्टात प्रत्यक्षपणे हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज आचार्य बालकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टासमोर माफी मागितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *