सुप्रिया सुळे दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर; लोकलने प्रवास केला!

दौंड, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामती मतदार संघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. कारण, या मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयींमध्ये लढत होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, सुप्रिया सुळे या सध्या बारामती मतदार संघाचा दौरा करीत आहेत. या प्रचार दौऱ्यात ते लोकांची तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेताना दिसत आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनी आज दौंड ते यवत असा लोकलने प्रवास केला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0jAsGp9J7JYoKeqqTYrL6JmGCemfH2kk4aFDTn1fcLSeFSYAV87KP4JradayeXQ32l&id=100044093303263&mibextid=Nif5oz

प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या

यादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांचे विविध प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित लोक तसेच लहान मुलांसोबत सेल्फी देखील काढला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, सोहेल खान, अजित शितोळे, सचिन काळभोर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, सुप्रिया सुळे या आज बारामती मतदार संघातील दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील यवत येथील काळ भैरवनाथ मंदिरात गावकऱ्यांशी संवाद साधला. खासदार म्हणून मला सलग 15 वर्ष काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते, अशा सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. तसेच पुन्हा एकदा मला खासदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.

पवार विरुद्ध पवार लढत?

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीतर्फे सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुनेत्रा पवार या देखील सध्या बारामती मतदार संघातील अनेक गावांचा दौरा करताना दिसत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे. मात्र, यासंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *