आचारसंहिता म्हणजे काय? वाचा थोडक्यात

मुंबई, 16 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भारतात लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. देशात 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात होणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. तर त्याचा निकाल 4 जून रोजीच लागणार आहे. दरम्यान, या तारखांची घोषणा झाल्यानंतर देशात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. यासंदर्भातील माहिती चला जाणून घेऊया.

आचारसंहिता म्हणजे काय?

निवडणूका निष्पक्षपातीपणे पार पडाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या नियमावलीला आचारसंहिता म्हटले जाते. या नियमावलीचे पालन करणे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना बंधनकारक असते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीची प्रकिया पार पडेपर्यंत आचारसंहिता लागू असते. तर आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधित उमेदवार किंवा राजकीय पक्षांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

कधीपासून सुरूवात झाली?

देशात सर्वप्रथम आचारसंहिता 1960 मधील केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये लागू करण्यात आली होती. आचारसंहिता तयार करताना कायद्याचा आधार घेतलेला नाही. मात्र आचारसंहितेतील काही नियम कायद्यातील कलमांच्या आधारे लागू करण्यात आलेले आहे. आचारसंहिता तयार करताना राजकीय पक्षांची तसेच तज्ज्ञांची मते विचारात घेण्यात आलेली आहे. तसेच आचारसंहितेमध्ये प्रत्येक निवडणुकीत नवनवीन नियम देखील केले जाऊ शकतात.

काय आहेत नियम?

देशात आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कोणतीही घोषणा किंवा कसलाही शासकीय निर्णय घेता येत नाही. याशिवाय विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटन यासारखे कार्यक्रम देखील करता येत नाही. सोबतच सरकारला कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची बदली करता येत नाही. तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे, दारू किंवा कोणत्याही प्रकारची भेटवस्तू देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या काळात मतदारांना आमिष दाखवणे किंवा धमकी देणे हे असले प्रकार म्हणजे आचारसंहितेचा भंग करणारे ठरते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय नेत्यांना निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहन किंवा सरकारी बंगल्याचा वापर करता येत नाही. याशिवाय आचारसंहितेच्या कालावधीत सबंधित उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना प्रचारसभा, रॅली यांसारख्या राजकीय कार्यक्रमांसाठी नियमावली घालण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जातीधर्मावरून समाजात तेढ निर्माण होईल, अशी कृती करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. तसेच त्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *