सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम वरील विश्वास कायम ठेवला, ईव्हीएम विरोधातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली, 16 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यावेळी ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएमबाबत याचिकेत व्यक्त करण्यात आलेल्या शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटले आहे. ईव्हीएमच्या वापराला विरोध करणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात काल सुनावणी झाली. यावेळी 19 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यासंदर्भात अशा दोन रिट याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.



2016-19 दरम्यान निवडणूक आयोगाच्या कोठडीतून गहाळ झालेल्या 19 लाख ईव्हीएमचा वापर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फेरफार करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी शंका याचिकाकर्त्यांनी यामध्ये उपस्थित केली होती. अशाप्रकारच्या शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे मत सुप्रीम कोर्टाने यावेळी व्यक्त केले आहे. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम संदर्भातील मुद्द्यांवर 10 हून अधिक प्रकरणांची तपासणी केली. त्याविषयीचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ह्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

यापूर्वी कोर्टाने याचिकाकर्त्यांना दंड देखील ठोठावला होता

त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवरील आपला विश्वास पुन्हा एकदा कायम ठेवला आहे. या दोन याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत ईव्हीएमबाबत दाखल करण्यात आलेल्या एकूण 40 याचिका फेटाळल्या आहेत. यासंदर्भात याचिकाकर्त्यांना कोर्टात पुरावे सादर करता आलेले नव्हते. त्यातील काही याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टाने दंड देखील ठोठावलेला आहे. त्यामध्ये 2021 मधील ईव्हीएम संदर्भातील अशाच एका याचिकेवर कोर्टाने याचिकाकर्त्याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच 2022 मध्ये ईव्हीएम संदर्भात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *