निलेश लंके आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार? अजित पवारांनी काय म्हटले?

बारामती, 14 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पक्ष सोडायचा म्हटल्यावर निलेश लंके यांना राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा दिल्याशिवाय कोणाला कोठेही जाता येत नाही. वास्तविक निलेश लंके यांना पक्षात मी घेतलं. त्यांना मी मनापासून आधार मी दिला. आताही निलेश लंके यांना विकासकामांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मदत मी केलेली आहे,” असे अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, अजित पवार हे आज बारामती मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

अजित पवारांची प्रतिक्रिया

निलेश लंके काल माझ्याकडे आले होते. त्यांना मी नीट समजून काही गोष्टी सांगितल्या आहेत. परंतू, त्यांच्या डोक्यात काही लोकांनी हवा घातली आहे की, तू खासदार होशील. पण वास्तविक तसे नाही. एकवेळ निलेश लंके हे पारनेरपुरते लोकप्रिय आहेत. पण बाकीच्या मतदारसंघामध्ये ते समजतात तितके सोपे नाही, मी त्यांना म्हटलं होतं, तुम्ही तशा पद्धतीने वागू नका. आता त्यांना जितके समजून सांगण्याची गरज होती, तितके मी केलेले आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या सोबत जाणार?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. तर याच मतदार संघातून भाजपने काल सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ही जागा अजित पवार यांच्या वाट्याला येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, निलेश लंके हे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या पक्षात गेल्यानंतर निलेश लंके यांना अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *