बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची विजय शिवतारे यांची घोषणा

मुंबई, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयींच्या मध्ये सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. अशातच शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी आपण बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, विजय शिवतारे हे आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार आहेत. यासंदर्भातील घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

विजय शिवतारे यांनी काय म्हटले?

“बारामती मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही, देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. मालकी कोणाची नाहीये. या मतदार संघात सहा विधानसभेचे मतदार संघ आहेत आणि म्हणून पवार पवार पवार करण्याऐवजी आपल्याला निश्चितपणे आपला स्वाभिमान जागृत करून आपण लढलंच पाहिजे,” असे विजय शिवतारे यावेळी म्हणाले. विशेषत: अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता, तो राजकारणाचा एक भाग आणि माझे कर्तव्य म्हणून केला होता. परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावती रुग्णालयात ऍडमिट होतो, मला बायपास करायला सांगितली, मी नाही केली. मी स्टेन टाकल्या फेल झालं आणि मी संपूर्ण प्रचार ॲम्बुलन्समधून केला होता. त्यावेळी अजित पवार हे मला उद्देशून मरायला लागलेला आहे, तर कशाला निवडणूक लढवतोय. तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललं आहे तुमचं, असे म्हणाले होते. माझी गाडी मग ती कोणत्या कंपनीची इतक्या खालच्या थराला अजित पवार आले. तू पुढे कसा निवडून येतो, तेच मी बघतो. महाराष्ट्राभरामध्ये मी कोणाला पाडायचं ठरवलं, तर मी कोणाच्या बापाचे ऐकत नाही आणि पाडतो म्हणजे पाडतोच, असे देखील अजित पवार म्हणाल्याचे विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितले.

5 लाख 80 हजार मतदान पवारांच्या विरोधात: शिवतारे

बारामतीत 6 लाख 80 हजार मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे, तर 5 लाख 80 हजार मतदान हे पवारांच्या विरोधात आहे, असे विजय शिवतारे यांनी यावेळी म्हटले आहे. “लोकशाहीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र लोकांना नावडत्या उमेदवारांना मतदान करण्याची संधी मिळत असेल, तर हा लोकशाही आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचा घात होतो आहे, असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ही निवडणूक बारामती लोकसभा मतदार संघातून लढविण्याचे ठरवले आहे,” अशी घोषणा विजय शिवतारे यांनी केली आहे.

बारामती मतदार संघात तिरंगी लढत?

विजय शिवतारे यांच्या या घोषणेमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. विजय शिवतारे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना सोपी जाणार नाही, हे देखील नक्की आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून कोण बाजी मारणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच येणाऱ्या काळात बारामती मतदार संघाचे राजकारण कोणत्या दिशेने जाते? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *