सुनेत्रा पवार आज बारामती मतदार संघाच्या दौऱ्यावर

बारामती, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बुधवारी (दि.13) बारामती मतदार संघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्या विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. तसेच त्या यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भेटी देखील घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्या सकाळी 8:30 वाजता बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नुतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच उद्या सकाळी 9 वाजता बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी अंबिका टेक्सटाईल या कापड शोरुमचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार या दुपारी 12 वाजता पुरंदर तालुक्यातील खळद-सासवड रोड येथील माऊली लॉन्स मंगल कार्यालयातील महिला व बालकल्याण विभागाच्या प्रशिक्षण कार्यशाळा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

लोकसभा उमेदवारीच्या चर्चा

दरम्यान, देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर,सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत बारामती मतदार संघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण, येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच सुनेत्रा पवार ह्या देखील गेल्या काही दिवसांपासून बारामती मतदार संघातील अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *