रिषभ पंत आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी तंदुरूस्त! बीसीसीआयची माहिती

दिल्ली, 12 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) टीम इंडियाचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तंदुरूस्त झाला आहे. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली आहे. रिषभ पंत मैदानात परतण्यासाठी पूर्णपणे तंदुरूस्त आहे. त्यामुळे तो आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. असे बीसीसीआय ने म्हटले आहे. त्यामुळे रिषभ पंतला आयपीएल स्पर्धेत खेळताना पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1767444671297646847?s=19

कार अपघात झाला होता

तत्पूर्वी, रिषभ पंतच्या कारचा 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून उत्तराखंडला जात असताना भीषण अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. या भीषण अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर रिषभ पंत बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तज्ञांच्या देखरेखीखाली सराव करत होता. त्यामुळे त्याला गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत खेळता आले नाही.

रिषभ पंतचे पुनरागमन!

त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाला रिषभ पंतची उणीव भासली होती. गेल्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात खेळला होता. तेंव्हा दिल्लीच्या संघाला साखळी फेरीतील 14 सामन्यांपैकी फक्त 5 सामने जिंकता आले. त्यामुळे दिल्लीचा संघ गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर राहिला होता. आता रिषभ पंतच्या संघातील समावेशामुळे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा 2024 च्या आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सच्या कामगिरीवर असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *