मुख्यमंत्री शिंदे यांचा आज पाहणी दौरा, या भागांची केली पाहणी

मुंबई, 07 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन काम गतीने करण्याचे निर्देश दिले. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वरळी येथे सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. याप्रसंगी, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी वेलारासु, सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

https://twitter.com/mieknathshinde/status/1765645132513358234?s=19

कोस्टल रोडची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तयार होत असलेल्या या कोस्टल रोडचे काम वेगाने पूर्ण होत आहे. या कोस्टल रोडवर 320 एकर जागेत भव्य असे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून, 200 एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. जागतिक दर्जाचे हे पार्क उभारण्यात येणार असून, लवकरच हा कोस्टल रोड नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मुंबई कोस्टल रोडला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी झालेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला.

विविध रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला

सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या विविध रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांची पाहणी केली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज वरळी येथील गणपतराव कदम मार्ग, वरळी आट्रीया मॉल समोरील एम के संघी मार्ग आणि दादरच्या शिवसेना भवन समोरील दादासाहेब रेगे मार्गावरील रस्ते काँक्रीटीकरण कामाची पाहणी करून या झालेल्या कामाची प्रगती जाणून घेतली. तसेच या कामाचा दर्जा उत्तम राखून ते विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्र्यांची रुग्णालयाला अचानक भेट

याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वरळी येथे सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करून तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील संवाद साधला. मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिलपासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी सूरू करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आशा 250 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने शहरात सुरू केले असून, या दवाखान्यात सर्व उपचार मोफत होतात. तसेच या दवाखान्याच्या माध्यमातून 143 प्रकारच्या चाचण्या विनामूल्य करण्यात येतात. आज या दवाखान्याला भेट देऊन येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून मिळणाऱ्या सेवेबद्दल ते समाधानी आहेत अथवा नाही, ते जाणून घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच दवाखान्यात पुरवण्यात येणारी औषधे, गोळ्या, साधने यांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी घेतली. तसेच मुंबईतील नागरिकांसाठी झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी आमलात आणून कॅशलेस आरोग्यसेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *