विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेला मुदतवाढ देण्याचा निर्णय

मुंबई, 06 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात 19 फेब्रुवारी ते 04 मार्च 2024 या कालावधीत जिल्हा स्तरावर विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेला आता मुदतवाढ देण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानूसार या मोहिमेला येत्या 9 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात सध्या विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे.

मोहिमेला 9 मार्च पर्यंत मुदतवाढ

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रुग्णांना या मोहिमेचा लाभ घेता यावा, यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा

या मोहिमेअंतर्गत राज्यभरात 1 लाख शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवलेले आहे. त्यासाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. या मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेची माहिती किंवा इतर आरोग्य विषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी 104 या टोल फ्री क्रमांकावर तसेच आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *