बारामती, 06 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती नगरपरिषदेने यावर्षी घरपट्टी आणि मालमत्ता करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना पत्र लिहून घरपट्टी आणि मालमत्ता करांमध्ये वाढ करू नये, अशी विनंती केली आहे. त्यांच्या या मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती शहराध्यक्ष संदीप गुजर आणि शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेऊन त्यांना दिले आहे.
बारामती नगरपरिषदेने यावर्षी घरपट्टी आणि मालमत्ता करांमध्ये मोठी वाढ केली आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे नागरीक अगोदरच चिंतेत असताना हि वाढ होत आहे. कोविड काळातील नुकसान अद्याप भरुन निघालेले नाही. त्यातच दुष्काळी परिस्थिती त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत आहे. त्यामुळे ही वाढ… pic.twitter.com/RWWiJ6Pbv7
— Supriya Sule (@supriya_sule) March 5, 2024
सुप्रिया सुळे यांनी पत्रात काय म्हटले?
बारामती शहर आणि परिसरात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या विवंचनेत आहेत. त्यातच बारामती नगरपरिषदेकडून घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता करांमध्ये वाढ होणेबाबत सूचित करण्यात आले आहे. मागील काही काळातील दुष्काळ व कोविड महामारी यामुळे अगोदरच अडचणीत असणाऱ्या नागरिकांची चिंता यामुळे वाढत आहे. बारामती नगपरिषद हद्दीतील घरे, दुकाने, हॉस्पिटल आणि इतर मिळकत धारकांना आकारण्यात आलेली कर आकारणी जास्त पटीने आकारली जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी आदी करांत वाढ करू नये
तसेच पुढेही नगरपरिषद या कर आकारणीत वाढ करणार असल्याबाबत नागरिकांना समजले आहे. तरी दुष्काळी परिस्थिती पाहता नगरपरिषदेकडून घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता आदी करात वाढ करण्यात येऊ नये, अशी त्यांच्याकडून मागणी होत आहे. कृपया नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून कर वाढ न करणेबाबत निर्णय घेण्यात यावा, ही विनंती. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी या पत्रातून केली आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषद सुप्रिया सुळे यांची विनंती मान्य करणार का? याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.