पॅट कमिन्स याची सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी निवड!

हैदराबाद, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धेचा 17 वा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वच संघ तयारीला लागले आहेत. अशातच सनरायझर्स हैदराबाद संघाने आपला कर्णधार बदलला आहे. सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याची कर्णधारपदी निवड केली आहे. त्यानुसार, पॅट कमिन्स आता या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याची अधिकृत घोषणा सनरायझर्स हैदराबादने ट्विट करून केली आहे.

https://x.com/SunRisers/status/1764523697204089294?s=20

एडन मार्कराम याला हटविले!

“ऑरेंज आर्मी…. आयपीएल 2024 साठी पॅट कमिन्स आमचा नवा कर्णधार आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे. सोबतच त्यांनी पॅट कमिन्सचा फोटो शेयर केला आहे. दरम्यान, पॅट कमिन्सची दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामच्या जागी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. एडन मार्कराम याने आयपीएलच्या गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना हैदराबाद संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली होती. एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली खेळताना गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाला 14 पैकी केवळ 4 सामन्यांत विजय मिळवता आला होता. या कामगिरीमुळे हैदराबादचा संघ गेल्या हंगामातील गुणतालिकेत शेवटच्या स्थानी होता.

पॅट कमिन्सला 20.50 कोटींना खरेदी केले

तत्पूर्वी, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने पॅट कमिन्स याला 20.50 कोटी रुपये या विक्रमी किंमतीला खरेदी केले होते. पॅट कमिन्स सध्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. कर्णधार म्हणून त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि क्रिकेट विश्वचषक या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे येत्या आयपीएल स्पर्धेत पॅट कमिन्स कर्णधार झाल्यानंतर हैदराबाद संघाची कामगिरी कशी होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *