बारामतीत विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन

बारामती, 02 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती मध्ये आजपासून विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

उमेदवारांना मुलाखती घेऊन त्यांना तिथेच रोजगाराच्या संधी दिल्या जाणार!

या रोजगार मेळाव्याकरिता बंदिस्त दालन, विविध स्टॉल्स, पिण्याचे पाणी, कार्यक्रम स्थळी स्वच्छतेच्या सुविधा, वाहनतळ, अल्पोपहार, बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर आदी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यामध्ये रोजगार इच्छुक असणाऱ्या दहावी, बारावी, आय.टी.आय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तिथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यासाठी नाव नोंदणी करून रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दोन दिवस नमो महारोजगार मेळावा

दरम्यान, बारामती येथे 2 आणि 3 मार्च असे दोन दिवस नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा रोजगार मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात 350 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी आतापर्यंत 33 हजारांच्या वर तरूण-तरूणींनी नोंदणी केली आहे. तर या रोजगार मेळाव्यात 43 हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा फायदा हजारो तरूण-तरूणींना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *