गौतम गंभीरची राजकारणातून निवृत्तीची घोषणा! ट्विट करून दिली माहिती

दिल्ली, 02 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. राजकारण सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे गौतम गंभीरने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच त्याने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे गौतम गंभीर आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गौतम गंभीरने ट्विटमध्ये काय म्हटले?

“मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा जी यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री अमित शाह यांचे मनापासून आभार मानतो.” असे ट्विट गौतम गंभीर याने केले आहे. त्याच्या या ट्विटची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गौतम गंभीर केकेआरचा मार्गदर्शक!

दरम्यान, गौतम गंभीरने आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत नुकताच करार केला आहे. यामध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका पार पडणार आहे. तत्पूर्वी, गौतम गंभीरने मार्च 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवली होती. यामध्ये गौतम गंभीरने आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरच्या जागी भाजप कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *