पुणे, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) इस्टेट एजंट असल्याचे भासवुन प्रॉपर्टी विकत घेण्याचे बहाण्याने घरात घुसुन दागिणे व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. अनिल ज्ञानेश्वर मलठणकर (58) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी उरुळी कांचन भागात छापा टाकून अटक केली आहे. त्याच्याकडून आयफोन 7 मॉडेलचा मोबाईल फोन व 36 हजारांचे एक सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण 46 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
तत्पूर्वी, 13 फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांना एकाने तुमचे घर विकत घेण्यासाठी माझ्याकडे पार्टी असुन त्यांना घर पाहण्यासाठी घेवुन येत असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादींनी त्यांना दुपारी साडेबाराची वेळ दिली व ते कामासाठी निघुन गेले. त्यानंतर फिर्यादी ते काम आवरून साधारण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरी आले, त्यावेळी ते खोलीत टेबलवर ठेवलेला दुसरा आयफोन मोबाईल फोन घेण्यासाठी गेले असता त्यांना मोबाईल फोन सापडला नाही. त्यावेळी त्यांनी याबाबत त्यांच्या आईला मोबाईल सापडत नाही असे विचारले. त्यावेळी एक इसम साडे अकराच्या सुमारास घरी आला होता. तो माझ्या शेजारी बसला व घर पाहुन येतो असे म्हणून आतील खोलीत गेला होता, असे फिर्यादी यांना त्यांच्या आईने सांगितले.
त्यावेळी त्यांना आईच्या गळ्यात तिचे सोन्याचे मंगळसुत्र दिसले नाही. त्याबाबत त्यांनी विचारले असता त्यांच्या आईने उशीखाली ठेवले होते असे सांगितले. मग त्यांच्या आईच्या उशाला ठेवलेले तिचे सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादींनी त्याची तक्रार सहकारनगर पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी पोलिसांनी कलम 380 प्रमाणे गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केला.
त्यावेळी पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांना सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरणारा हा इसम उरुळी कांचन भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांचे एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी जाऊन छापा टाकला आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी आयफोन 7 मोबाईल फोन व 36 हजारांचे एक सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण 46 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत.