इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरू! 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार

पुणे, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरूवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळाच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, लातूर, नाशिक, कोकण, कोल्हापूर, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागीय मंडळांचा समावेश आहे. यंदा राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण 16 लाख 09 हजार 445 विद्यार्थी बसलेले आहेत. तर राज्यातील 5 हजारांच्या वर केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ

इयत्ता दहावीची परीक्षा 01 मार्च ते 26 मार्च या कालावधीत होणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तास आधी केंद्रावर हजर रहावे, अशा सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. दरम्यान, परीक्षा केंद्रांवर शांतता आणि सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी शिक्षण मंडळाने सर्व खबरदारी घेतली आहे. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने भरारी पथके स्थापन केली आहेत.

यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली

तत्पूर्वी, यंदाच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 32 हजारांनी वाढली आहे. राज्यातील 05 हजार 086 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रावर कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्यात आले आहेत. तर शिक्षण मंडळाने दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *