जरांगे पाटलांना जालनामधून लोकसभेची उमेदवारी द्या, वंचित बहुजन आघाडीची मागणी

मुंबई, 28 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात आज लोकसभेच्या जागावाटपांसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने मनोज जरांगे पाटील यांना जालना मधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. दरम्यान, त्यांच्या या मागणीवर जरांगे पाटलांचे काय म्हणणे आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीत 27 मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या मतदार संघाची यादी वंचित बहुजन आघाडी पक्षाने महाविकास आघाडीला दिली आहे. तसेच लोकसभा उमेदवारांच्या यादीत 15 ओबीसी आणि 3 अल्पसंख्यांक उमेदवार असले पाहिजे, अशी देखील मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

https://twitter.com/VBAforIndia/status/1762820184405123391?s=19

लेखी वचन दिले पाहिजे!

महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केली आहे. त्यामुळे त्यांच्या या मागण्यांवर महाविकास आघाडी कोणता निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा हा आहे की, विभाजनवादी भाजप-आरएसएसचा पराभव झाला पाहिजे आणि सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात एकजुटीने लढले पाहिजे, असेही वंचित बहुजन आघाडी पक्षाने म्हटले आहे.

चर्चा करण्यास तयार आहोत!

वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन, या आधी आम्ही ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली. त्या लोकसभा मतदारसंघाची यादी आम्ही तयार केली होती. आता महाविकास आघाडीने आमच्या सोबत चर्चा सुरू केली आहे, तर आम्ही आमच्या त्या मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला देत आहोत. सदर यादी आम्ही स्वतंत्र गेलो असतो, तर त्यासाठी आम्ही तयार केली होती. आम्हाला आशा आहे की, या मतदारसंघांवर तीन पक्षांसोबत फलदायी चर्चा आणि वाटाघाटी होऊ शकतील. काही मतदारसंघ सोडून आम्ही या जागांवर चर्चेला तयार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीने या प्रस्तावात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *