देशात 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान? पाहा व्हायरल मेसेज मागील सत्य!

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सॲपवर चांगलाच व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने हा व्हायरल होणारा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने अद्याप लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे अशाप्रकारच्या व्हायरल होणाऱ्या मेसेजकडे लक्ष देऊ नये आणि तो मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नये, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

https://twitter.com/ECISVEEP/status/1761278667940872538?s=19

व्हायरल मेसेजमध्ये नक्की काय म्हटले?

निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेद्वारे प्रत्येक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाते. तसेच निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा व्हॉट्सॲपवर किंवा सोशल मीडियावर कधीही जाहीर केल्या जात नाहीत, हे देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या व्हायरल होणाऱ्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, “देशात 12 मार्च रोजी निवडणूकीची अधिसूचना आणि आचारसंहिता लागू होईल, 19 एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान, 22 मे रोजी मतमोजणी आणि 30 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, हा व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे.

निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार?

दरम्यान, देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत देशातील जनता आणि सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तारखांची वाट पाहत आहेत. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *