बारामतीत 2 मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन! अजित पवारांनी घेतली आढावा बैठक

मुंबई, 26 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथे येत्या 2 मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील विविध मंत्री आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बारामती येथे येत्या 2 आणि 3 मार्च रोजी हा महारोजगार मेळावा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात बारामती येथे होणाऱ्या विभागास्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1762095506459951293?s=19

अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश

या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरूणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी या बैठकीतून सबंधित अधिकाऱ्यांना दिले. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्याकरिता बंदिस्त दालन, विविध स्टॉल्स, पिण्याचे पाणी, कार्यक्रम स्थळी स्वच्छतेच्या सुविधा, वाहनतळ, अल्पोपहार, बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर आदी सुविधांची उत्तम व्यवस्था करावी. या मेळाव्यामध्ये रोजगार इच्छुक असणाऱ्या दहावी, बारावी, आय.टी.आय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तिथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्यासाठी नाव नोंदणी करून रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ह्या मेळाव्यात युवक व युवतींनी सहभागी होण्यासाठी या लिंक  वर क्लिक करा. तसेच नियुक्तांसाठी (For Employer registration) या लिंक वर क्लिक करून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बारामतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

दरम्यान, या मेळाव्यासोबतच बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन, पोलिसांसाठीच्या घरांचे लोकार्पण, पोलीस विभागाला देण्यात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पण, सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन, बारामती बसस्थानकाचे लोकार्पण आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच यादिवशी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारक, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या ठिकाणीही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *