जालना, 26 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे आमरण उपोषण आज मागे घेतले आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जरांगे पाटील हे गेल्या 17 दिवसांपासून अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसले होते. मात्र, आज अखेर त्यांनी हे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना काल अंतरवाली सराटी सारखा लाठीचार्ज घडवायचा होता. फडणवीस यांचे काल राज्यात पुन्हा एकदा दंगल घडविण्याचे स्वप्न होते. मात्र, मी तसे होऊ दिले नाही. असा दावा जरांगे पाटलांनी केला आहे.
दोन दिवसांत पुढची दिशा ठरवणार!
दरम्यान, राज्य सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र असे 10 टक्के आरक्षण दिले होते. मात्र, मनोज जरांगे पाटील हे कुणबी मराठा संदर्भातील सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी ठाम आहेत. उपोषण मागे घेतले असले तरीही साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटलांनी सांगितले आहे. तसेच येत्या 2 दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप
तत्पूर्वी, कालच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले होते. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. मला सलाईनमधून विष देवून मारण्याचा त्यांचा डाव आहे. तसेच माझे एन्काऊंटर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे, असे आरोप जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले होते. तसेच फडणवीस यांना मला मारायचेच असेल, तर मी त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, तेथे मला मारून टाका, असे म्हणत जरांगे पाटील हे काल रागाच्या भरात मुंबईकडे रवाना झाले होते.
जरांगे पाटील वैद्यकीय उपचार घेणार
मात्र त्यांना जालना जिल्ह्यातील भांबेरी गावातील ग्रामस्थांनी रस्त्यातच अडवले आणि त्यांना काल मुंबईला जाऊ दिले नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी काल रात्री भांबेरी गावातच मुक्काम केला. त्यानंतर आज सकाळी मनोज जरांगे हे त्यांच्या अंतरवाली सराटी गावात गेले. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा करून हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. जरांगे पाटील हे आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणार आहेत. तसेच येत्या 2 दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.