ट्रॅक्टरची ट्रॉली तलावात पडल्याने 15 भाविकांचा मृत्यू;

कासगंज, 24 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील एका रस्त्यावर मोठा अपघात झाला आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कासगंजमधील पटियाली दरियावगंज रस्त्यावर एक ट्रॅक्टरची ट्रॉली तलावात पडली. या अपघातात 15 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. ते सर्वजण माघी पौर्णिमेनिमित्त कासगंज येथील कादरगंज गंगा घाट येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. त्यावेळी रियावगंज पटियाली मार्गावरील गधई गावाजवळ हा अपघात झाला. त्यामुळे घटनास्थळी मोठ्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

https://twitter.com/PTI_News/status/1761304797188092399?s=19

मृतांमध्ये महिला आणि लहान मुले

स्थानिक नागरिक आणि पोलीस सध्या बचाव कार्यात गुंतले आहेत. तलावातून बाहेर काढण्यात आलेल्या भाविकांना पतियाळी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या ट्रॅक्टरच्या ट्रॉली मधून सुमारे 40 भाविक प्रवास करीत होते. तर हे भाविक एटा जिल्ह्यातील जयथरा या गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारा हा ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर गेला आणि रस्त्यावरून तलावात पडला. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 मुले आणि 8 महिलांचा समावेश आहे.

https://twitter.com/myogiadityanath/status/1761281186020937734?s=19

जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना

सध्या घटनास्थळी बुलडोझर आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी अजुनही बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी पोलीस देखील उपस्थित आहेत. सध्या या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तर या घटनेबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. “कासगंज जिल्ह्यात झालेल्या एका रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानी अत्यंत हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. सर्व जखमींवर योग्य ते मोफत उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मृतांच्या आत्म्याला शांती लोभो आणि जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे ही भगवान श्री राम चरणी प्रार्थना,” असे ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *