शरद पवार यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर तुतारी या पक्षचिन्हाचे अनावरण

रायगड, 24 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या तुतारी या पक्षचिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. यासाठी रायगडावर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून तुतारी चिन्हाचे अनावरण केले.

https://twitter.com/NCPspeaks/status/1761286736787730618?s=19



दरम्यान, तुतारी पक्षचिन्हाच्या अनावरणासाठी शरद पवार हे तब्बल 40 वर्षानंतर आज रायगडावर गेले होते. वयोमानामुळे आणि तब्येतीच्या कारणावरून शरद पवार यांना रायगड किल्ला चढणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांना रोपवे आणि पालखीच्या साहाय्याने रायगडावर नेण्यात आले. यावेळी शरद पवार यांच्यासोबत सुरक्षा रक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी देशातील विविध प्रश्नांच्या विरोधात एकजुटीने लढण्याबाबत आपले मत व्यक्त केले. तसेच छत्रपतींचा आदर्श नजरेसमोर ठेऊन राज्य उभं करू, जनतेची सेवा करू असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1761294933351145626?s=19

तुतारी ही एका संघर्षाची सुरूवात करण्याची प्रेरणा असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य जिथून चालत होते तिथे आपण आलो आहोत. छत्रपतींचा आदर्श नजरेसमोर ठेऊन राज्य उभं करू. कष्ट, शौर्य आणि त्यागातून आपल्याला यश मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले होते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार गट या नवीन चिन्हावर निवडणूक लढविणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *