जालना, 24 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) कुणबी प्रमाणपत्र संदर्भातील सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून राज्यभरात रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आज या आंदोलनाची वेळ बदलली आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेतच आंदोलन करा. सायंकाळी 4 ते 7 या वेळेत आंदोलन करू नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केले आहे. सोबतच मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उद्या पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगितले आहे. ही बैठक शेवटची असून ती निर्णायक असणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन
आज सकाळी 11 ते 1 या वेळेत राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करा. त्यानंतर सायंकाळी 4 ते 7 वाजता होणाऱ्या रास्ता रोकोचे धरणे आंदोलनात रूपांतर करा. हे आंदोलन एकदम शांततेत करा. या आंदोलनामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही त्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना या आंदोलनाचा त्रास होता कामा नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केले आहे.
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक होणार
तसेच उद्यापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार नाही, अशी घोषणा देखील जरांगे पाटील यांनी यावेळी केली. अंतरवाली सराटी येथे उद्या दुपारी यासंदर्भात शेवटची एक निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच मला मराठा समाजाशी महत्त्वाचे बोलायचे आहे. मला त्यांना खूप काही सांगायचे आहे. त्यासाठी सर्व मराठा बांधवांनी उद्या अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.