मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली मनोहर जोशी यांना श्रद्धांजली

मुंबई, 23 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले: मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. असे मुख्यमंत्री यामध्ये म्हणाले. महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. त्यामुळेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षणाकडे वळवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली: मुख्यमंत्री

“शिवसेना – भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवरील कामाचा त्यांना दांडगा अनुभव होता. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

एक कडवट असा सच्चा शिवसैनिक गमावला: एकनाथ शिंदे

“आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *