शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

मुंबई, 23 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज पहाटे 3 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिवसेना पक्षावर शोककळा पसरली आहे.

https://twitter.com/ANI/status/1760839771507618106?s=19

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

मनोहर जोशी यांचे पार्थिव आज सकाळी 11 ते 2 या वेळेत माटुंगा पश्चिम येथील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मनोहर जोशी हे राजकारणापासून दूर होते.

मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द

मूळचे बीडचे असलेले मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला. मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत मानले जायचे. त्यांची राजकीय कारकीर्द मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून सुरू झाली. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यानंतर ते महापौर, विधान परिषद सदस्य, आमदार, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा सभापती झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *