मुंबई, 18 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम 19 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात 1 लाख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालय, मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय याठिकाणी मोफत केल्या जाणार आहेत. तरी नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
https://twitter.com/MahaHealthIEC/status/1759177024676221015?s=19
19 फेब्रुवारी ते 4 मार्च कालावधीत मोहीम
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 19 फेब्रुवारी ते 4 मार्च या पंधरवड्यात संपूर्ण राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 1 लाख शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वंयसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा होणार लाभ
दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने 2022 पासून राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत 2022 ते 2025 या तीन वर्षात 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या 23 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे. याची माहिती राज्याच्या सार्वजानिक आरोग्य विभागाने दिली आहे.