शारदानगरचे विद्यार्थी गिरवताहेत नवतंत्रज्ञानाचे धडे! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर सुरू

बारामती, 17 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना सुप्त वाव देण्यासाठी व शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना पायथन कोडींग आणि डेटा सायन्सची अभिरुची निर्माण व्हावी, यासाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर बारामती यांच्या मार्फत वेगवेगळ्या आधुनिकतेच्या जगात नवीन तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शिकवत आहेत. यासाठी शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्र याठिकाणी देशातील ग्रामीण भागातील सायन्स सेंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी केला कोर्स

शारदानगरचे विद्यार्थी शिक्षण, शेती, साहित्य, कला, क्रीडा, क्षेत्राबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जात दैदिप्यमान यश मिळवत संस्थेच्या वैभवात भर पाडत आहेत शेकडो अधिकारी घडवण्यात संस्थेचा खारीचा वाटा आहे, तसेच सायन्स सेंटरमार्फत वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम देखील आत्मसात करत आहेत. विद्यार्थी पायथन कोडींगसारख्या संगणकीय लँग्वेजमधून आपापले सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहीत आहेत आणि त्याचा वापर करून नवीन व्यावसायिक कौशल्ये शालेय वयातच शिकत आहेत. आजपर्यंत शारदानगरमध्ये इयत्ता आठवीपासून पदवीपर्यंतच्या जवळपास 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केला आहे. वेगवेगळे अँड्रॉइड अँप्लिकेशन तयार करणे, कॉम्प्युटर प्रोग्राम लिहिणे ही कामे मुले लिलया करीत आहेत.

खेड्यातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळणार

विज्ञानाची आस असलेल्या परंतु शाळेमध्ये शिकण्यास मर्यादा असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे, त्यांच्या चिकित्सक वृत्तीला चालना देवून विज्ञान समजण्यासाठी व भविष्यातील वैज्ञानिक घडविण्याच्या हेतूने बारामतीत या सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्‍टिव्हिटी सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. बारामती परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आसपासच्या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पना विकसित व्हाव्यात, संशोधक वृत्ती वृद्धिंगत व्हावी यासाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायन्स सेंटरच्या व्यवस्थापक हिना भाटीया, संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे, एचआर प्रमुख गार्गी दत्ता, मुख्याध्यापक अमोल घोडके, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंढे, श्री योगेश झणझणे, श्री नितीन साळुंखे हे परिश्रम घेत आहेत. त्यामुळे या संस्थेत जे नाविन्यपूर्ण संशोधनाचे वातावरण तयार होईल. अशा प्रकारच्या नवनवीन संकल्पना ग्रामीण भागात राबवल्यामुळे जी इकोसिस्टीम तयार होईल, त्यातून भविष्यात नक्कीच चांगले संशोधक आणि उद्योजक घडण्यास मदत होणार आहे यात तिळमात्र शंका नाही.

कृषी विज्ञान केंद्र येथे सायन्स सेंटर सुरू

खरंतर देशातील व परदेशातील बहुतांशी सायन्स पार्क हे शहरांमध्ये होते व आहेत. सहसा शहरातील पालक आपल्या पाल्याच्या बौद्धिक विकासाला वाव देण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु ग्रामीण भागांतील पालकांचे त्यांच्या दैनंदिन कामामुळे कळत न कळत मुलांकडे दुर्लक्ष होते आणि त्या मुलांना तशा सोयीही उपलब्ध नसतात. वास्तविक मूल हे मूल असते, ते शहरी किंवा ग्रामीण भागातील असले तरी त्यांच्यातील टॅलेंट एकसारखे असते प्रश्न असतो तो त्यांना वाव देण्याचा आणि व्यासपीठ मिळण्याचा हेच व्यासपीठ ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी ग्रामीण भागांतील मुले मागे राहू नयेत, तसेच आसपासच्या ग्रामीण मुलांनी प्रयोग करावेत, त्यांनीही बौद्धिक प्रगती करावी व भविष्यातील यातीलच काही शास्त्रज्ञ बनतील ही अपेक्षा ठेवून कृषी विज्ञान केंद्र येथे देशातील ग्रामीण भागातील सायन्स सेंटर उपलब्ध करून दिले आहे.

बारामतीतील शाळांना होणार फायदा

तर येत्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम खास इयत्ता पाचवीपासून सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. निलेश नलावडे यांनी दिली आहे. बारामतीतील ज्या शाळांना पायथन कोडींग, डेटा सायन्स सारखे अभ्यासक्रम आपल्या शाळेत शिकवण्याची इच्छा असेल त्यांनी 7058165404 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन सायन्स सेंटरमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *