मुंबई, 16 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण केले होते. या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे सोपवला आहे. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी हा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपुर्द केला आहे. याप्रसंगी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मागासवर्ग आयोगाचे आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1758340965335740610?s=19
मुख्यमंत्र्यांनी मागासवर्ग आयोगाचे कौतुक केले
यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. या सर्वेक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार, मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज राज्य सरकारला दिला आहे.
विशेष अधिवेशनात हा अहवाल मांडण्यात येणार
राज्य सरकार हा अहवाल आता विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मांडणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.