राजकोट, 15 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून खेळविण्यात येत आहे. हा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, 5 सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. यातील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली. तर दुसऱ्या कसोटीत भारताने विजय मिळवला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1757972009563357398?s=19
https://twitter.com/BCCI/status/1757974378132988162?s=19
सरफराज खान, ध्रुव जुरेल यांचे पदार्पण
आजच्या सामन्यात भारतीय संघात 4 बदल करण्यात आले आहेत. या सामन्याच्या माध्यमातून सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी भारतीय संघात पदार्पण केले आहे. तसेच रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांचे देखील या सामन्यातून संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना संघाबाहेर बसावे लागले. दरम्यान, दुखापती आणि प्रमुख खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे भारतीय संघ सध्या त्रस्त आहे. विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित सामन्यातून ही माघार घेतली आहे. केएल राहुल दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. तर श्रेयस अय्यर सध्या खराब फॉर्म मधून जात आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघात आज सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळाली आहे. हे दोघे या संधीचे सोने करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कशी असेल राजकोटची खेळपट्टी?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. राजकोटची खेळपट्टी सुरूवातीला फलंदाजांसाठी अनुकूल असणार आहे. मात्र, यानंतर फिरकी गोलंदाजांना मोठी मदत मिळणार आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या दिवसानंतर गोलंदाजांनाही या खेळपट्टीची मदत मिळू शकते.
भारतीय संघ:-
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघ:-
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.